Breaking News

सरसंघचालक मोहन भागवतांचा ड्रग्जसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्लाबोल

नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील ड्रग्जचे व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजवरून हल्लाबोल केला. नागपूरमधील विजयादशमीच्या भाषणात भागवत यांनी देशातील वाढत्या ड्रग्जच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली, तसेच राज्य सरकारला ड्रग्ज व्यसनांचे पूर्ण निर्मूलन करावे लागेल, असे मत व्यक्त केले. या वेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मितीवरही निशाणा साधला. त्यावर नियंत्रणाची मागणी केली. ते दसर्‍यानिमित्त नागपूरमध्ये बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इस्राईलचे वाणिज्यदूत कोब्बी शोशानीदेखील उपस्थित आहेत. मोहन भागवत म्हणाले, तंत्रज्ञानाच्या आधारावर नवनव्या गोष्टी येत आहेत. या गोष्टी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाही. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येते? आता कोरोना काळात तर लहान मुलांच्या हातातसुद्धा मोबाइल आलाय. ऑनलाइन काय पाहायचे, काय नाही याचे काहीच नियंत्रण नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवायचे यावरही नियंत्रण नाही. देशात वेगवेगळ्या नशेचे पदार्थ येतात त्याचे व्यसन वाढत आहे. ते कसे रोखायला हवे हे माहिती नाही. उच्च वर्गापासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत भयंकर व्यसनाचे प्रमाण आहे. या नशेच्या पदार्थांच्या व्यापारातून आलेला पैसा कुणाच्या हातात जातो हे सर्वांना माहिती आहे. देशविरोधी कामात त्याचा उपयोग होतो. सीमेपलीकडील देश या नशेच्या पदार्थांच्या व्यापाराला प्रोत्साहन देतात. असे सर्व सुरू आहे, असे भागवत यांनी सांगितले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply