पनवेल : रामप्रहर वृत्त
राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या मायाक्का देवीचा हार जागरला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांतर्फे त्यांचा धनगर समजाचे प्रतीक घोंगडी, काठी, फेटा व फोटो प्रतिमा देऊन धनगरी पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.
दरवर्षी कामोठे येथे ‘मायाक्का देवीचा हार जागर’ साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात हा जागर झाला. या वेळीही आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक दिलीप पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, तेजेस कांडपिळे, गोपीनाथ भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखडे, राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश बेरगळ, उपाध्यक्ष पांडुरंग यमगर, सचिव रावसाहेब बुधे, कामोठे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब मगदूम, खजिनदार अशोक माने, सहखजिनदार एन. डी. बुधे, माणिक सरगर, अर्जुन गावडे, कैलास सरगर, किसन यमगर, संघटक एकनाथ हुबाले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कामोठेतील मायाक्का देवी मंदिर धनगरांचे आराध्य देवस्थान आहे. या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. पनवेल, नवी मुंबई व मुंबईतील भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. कर्नाटक येथे रायबाग तालुक्यातील चिंचणी या गावी मायाक्का देवीचे मूळ मंदिर आहे. कामोठे वसाहतीमध्ये सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत.
या समाजातील मंडळींनी एकत्र येऊन 2009मध्ये राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्थेची स्थापना केली आहे. या कालावधीत संस्थेने सेक्टर 35 मध्ये मायाक्का देवीचे मंदिर बांधले. मंदिरातील मूर्ती पंढरपूर येथून आणली आहे. देवीच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर भाविकांना चिंचणीला जाण्याची अनुभूती येते, असे म्हटले जाते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंदिरात पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. या ठिकाणी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील नामवंत गजी ढोल नृत्य मंडळ कलाविष्कार सादर करतात. धनगरी ओव्या व धनगरी कैफियतच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन केले जाते.