Breaking News

सुनील तटकरेंचे लोटांगण

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आता नाराजांना जवळ करण्यासाठी घालीन लोटांगणाचा प्रयोग सुरू केला आहे. त्यांच्या या लोटांगणापुढे काँग्रेसचे नेते आपापली तलवार म्यान करून सहभागी होऊ लागलेले आहेत. त्यातून काँग्रेसजनांच्या हतबलतेचे दर्शन घडते. दुर्दैव दुसरे काय म्हणायचे.

रायगडात राजकारण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच तापू लागलेय. सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना रंगणार आहे. त्याची जोरदार तयारीही उभयतांकडून सुरू आहे.या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसने राष्ट्रवादी, शेकाप महाआघाडीत सहभागी होण्यास विरोध दर्शवित सवतसुभा करण्याचा इरादा व्यक्त केला होता, पण त्यांचा हा इरादा तटकरे यांनी उधळून लावत काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्यात यश मिळविले आहे. अर्थात त्यासाठी तटकरे यांनी नेहमीप्रमाणे घालीन लोटांगण हा फॉर्म्युला वापरत तलवार उपसणार्‍या काँग्रसचे नेते माणिकराव जगताप, मधू ठाकूर यांना लढाईपूर्वीच आपापल्या तलवारी म्यान करण्यास भाग पाडले आहे.  काँग्रेसवाले आधी बोलतात तावातावाने आणि मग त्यांचे अवसान असे काही गळून पडते की बोलायला नको.  सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही तटकरे यांनी काँग्रेसला गळाला लावून निवडणूक लढविली. रोह्यात पुतण्याने जर गद्दारी केली नसती, तर सुनीलशेठ मागील लोकसभा निवडणुकीत दिल्लीत पोहोचले असते. दुर्दैवाने त्यांची राजधानी एक्स्प्रेस चुकली, पण आपला पराभव काँग्रेसमुळेच झाला आहे असा गैरसमज करून घेत तटकरेंनी मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्याचा विडा उचलून तो प्रत्यक्षात देखील आणला होता. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसजनांनी राष्ट्रवादीला यापुढे कुठल्याही प्रकारची साथ न देण्याचा निर्धार केला होता. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीने शेकापशी आघाडी करून काँग्रेसला नामशेष करण्याचा विडाच उचलला. जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसला दुय्यम स्थान देत राष्ट्रवादीने या पक्षाला संपविण्याचाच प्रयत्न सुरू केला. लोकसभा निवडणुकीत तर काँग्रेसने राष्ट्रवादी, शेकाप महाआघाडीत सहभागी होण्यास स्पष्ट नकार देत बहिष्काराचे अस्त्र उगारले होते, पण त्यांचे हे बहिष्काराचे अस्त्र सुनील तटकरेंनी निष्प्रभ ठरविले आणि काँग्रेसच्या नेत्यांना आपली तलवार म्यान करण्यास भाग पाडले. आधी जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांना गळाला लावून त्यांच्याच हस्ते प्रचाराचा शुभारंभ किल्ले रायगडावर केला. त्यानंतर धुळवडीच्या शुभेच्छा देण्याचे निमित्त करून अलिबागचे माजी आमदार मधू ठाकूर यांच्यापुढे लोटांगण घालत त्यांचाही राग शांत केला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर याच मधू ठाकूरांनी सुनील तटकरे यांना अलिबागेत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती, पण ती गर्जना तटकरेंनी हवेतच विरून टाकत चक्क ठाकूरांच्या निवासस्थानावर चाल करीत त्यांना थंड केले. असेच करायचे होते, तर मग काँग्रेसवाल्यांनी अशी नाटके का केली, हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. मधू ठाकूर असोत वा माणिकराव जगताप त्यांनी कितीही बंडाच्या वल्गना केल्या तरी त्यांना तटकरे पुरून उरतात हेच यावरून स्पष्ट होते.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply