पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यामधील गुळसुंदे गावातील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी साडेतीन गुंठे क्षेत्रात बासमती तांदळाचे यशस्वी उत्पन्न मिळविले आहे.
नुकताच कृषिभूषण पुरस्कार मिळालेले मिनेश गाडगीळ यांना शेतीक्षेत्रात विविध प्रयोग करण्याची आवड आहे. शेतकर्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पीक लागवड केल्यास पिकाचे उत्पन्न वाढते. पारंपारिक पद्धत बाजुला ठेवून आर्थिक फायदा मिळवून देणारे पिकांचे उत्पन्न घेणे गरजेचे असते. या हेतूने गाडगीळ यांनी यंदा त्यांच्या शेतातील साडेतीन गुंठ्यात आरजे 100 बासमती व सौभाग्य कोलम जातीच्या भात बियाण्यांची पेरणी केली होती.
निसर्गाच्या लहरीपणामुळे भातपिकाचा संपूर्ण अभ्यास करूनच पेरणी केली होती. पीक किती दिवसांत किती वाढेल, अधिक उंच होणार नाही, किती दिवसांत तयार होईल या अभ्यास करूनच बियाणे पेरण्यात आले. 8 जूनला पेरणी केल्यानंतर 12 जुलै रोजी लावणी करण्यात आली. 8 ऑक्टोबरला भातपीक शेतात संपूर्णपणे तयार होऊन डोलू लागले होते. गाडगीळ यांनी स्वत: तयार केलेल्या खतांचा वापर या पिकांसाठी केला. अवघ्या साडेतीन गुंठ्यात 92 किलो बासमती तांदळाचे उत्पन्न घेण्यास प्रयोगशील शेतकरी गाडगीळ यांना यश आले. म्हणजेच प्रती गुंठे 26.3 किलो आणि 1050 किलो प्रती एकर तांदळू पिकवता येणे शक्य असल्याचा यावरून लक्षात आले आहे.
बासमती तांदळू पनवेलच्या मातीत पिकू शकतो, हे या प्रयोगातून पुढे आले आहे. माझ्याप्रमाणे इतर एकाही शेतकर्याने भातपीक घेतले तर माझा प्रयोग यशस्वी झाला, असे मला वाटेल. पुढील वर्षी मला आणखी नवा प्रयोग करण्याची इच्छा असून काळा तांदूळ पिकविण्याचा माझा विचार आहे.
-मिनेश गाडगीळ, शेतकरी