प्रवासी संतप्त, भाजपचा आंदोलनाचा इशारा
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव बसस्थानकात प्रचंड खड्डे पडले असून, या समस्येकडे गेल्या अनेक वर्षापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळ दुर्लक्ष करीत आहे. पालकमंत्री व स्थानिक आमदार आदिती तटकरे बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे लक्ष देतील काय, असा सवाल प्रवासी व नागरिक उपस्थित करीत आहेेत. दरम्यान, या बस्थानकातील रस्त्याचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत मार्गी न लागल्यास 1 नोव्हेंबरला रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे.
माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. येथील एसटी बस स्थानकामध्ये रोज 350 पेक्षा जास्त गाड्यांची ये-जा सुरू असते, मात्र या बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. प्रवाशी शेडवरील स्लॅब पाडण्यात आला आहे. तेथे टाकलेले पत्रे चक्रीवादळात उडून गेले आहेत. त्याठिकाणी तात्पुरते पत्रे टाकण्यात आले आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही या बस स्थानकात सगळीकडे खड्ड्यांचेच साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथून चालत जाणे आणि गाड्या चालविणे अवघड झाले आहे. दरवर्षीप्रमाणे या बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच मोठा खड्डा पडला असून, त्यात कायम पाणी साठलेले असते. हे खड्डे भरण्यास ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचे समजते. एसटी महामंडळाने तीन वर्षापूर्वी येथील खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली होती, पण कायमचा हा प्रश्न सोडविण्यासाठी हे महामंडळ प्रयत्न करीत नाही. तर स्थानिक आमदार असलेल्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचेही माणगाव एसटी स्थानकाकडे दुर्लक्ष झाले आहे.
दरम्यान, माणगाव एसटी स्थानकाच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक झाला आहे. बस्थानकातील रस्त्याचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावावे, अन्यथा 1 नोव्हेंबरला बसस्थानकासमोरच रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे दिला आहे. ढवळे यांनी या निवेदनाच्या प्रती विधानसभा व विधान परिषद विरोधी पक्षनेते, माणगाव विभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.