अल अमिरात ः वृत्तसंस्था
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात उलटफेर पाहावयास मिळाला. स्कॉटलंडने जबरदस्त कौशल्य दाखवत बांगलादेशवर सहा धावांनी विजय मिळविला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाह याने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. स्कॉटलंडने 20 षटकांत 9 गडी बाद 140 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकात 7 बाद 134 धावांपर्यंतच पोहचता आले. स्कॉटलंडने 20 षटकांत 9 गडी गमावून 140 धावा केल्या. ख्रिस ग्रीव्हसने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 45 धावा केल्या. त्याने मार्क वॅट (22) सोबत सातव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. बांगलादेशकडून मेहदी हसनने तीन, तर शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. लिटन दास आणि सौम्या सरकार हे त्यांचे दोन्ही सलामीवीर वैयक्तिक आणि प्रत्येकी 5 धावांची भर घालून तंबूत परतले. त्यानंतर मुशफिकूर रहिमने (38) संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण धावगती वाढवण्यात तो अपयशी ठरला. कप्तान महमूदुल्लाह खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशला विजयाची आशा होती, मात्र 19व्या षटकात व्हीलने त्याला बाद करीत स्कॉटलंडचा विजय निश्चित केला. स्कॉटलंडकडून व्हीलने तीन, तर ग्रीव्ह्जने दोन बळी घेतले.
बांगलादेशसाठी धोक्याची घंटा पहिल्याच सामन्यात नवख्या स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. आता सुपर 12 म्हणजेच अंतिम 12 संघांमध्ये पोहचून मुख्य स्पर्धा खेळण्यासाठी बांगलादेशला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. स्कॉटलंडने दिला तसाच आणखी एखादा धक्का बांगलादेशला मिळाला, तर अंतिम 12मध्ये खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंग होईल.