Breaking News

खोपोलीपासून पाताळगंगेच्या प्रदूषणाला सुरूवात

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेली पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, आतापर्यंत सुरक्षित असलेला खोपोलीतील गगनगिरी मठाजवळील  उद्धभवदेखील प्रदूषित झाला आहे.

सह्याद्री पर्वतात उगम पावणारी पाताळगंगा नदी खोपोलीमार्गे गगनगिरी मठाला वळसा घालून खालापूर परिसरातून वाहत आपटा गावाजवळ खाडीला मिळते. खालापूर, पेण आणि पनवेल या तीन तालुक्याला समृद्ध करणारी पाताळगंगा नदीवर कारखानदारीमुळे रासानिक अत्याचार होत आहेत. त्यात आता भर पडत आहे, ती नदीकाठावरील वाढत्या नागरी वस्तीची. शहरातील सांडपाणी थेट पाताळगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे नदी पात्र प्रदूषित होत आहे.

खालापूर तालुक्याला उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईवर उपाय म्हणून पातळगंगा नदीतून टँकरने पाणी उचलून ते टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये पोहोचवले जात होते. गेली कित्येक वर्ष गगनगिरी मठा जवळून टँकरद्वारे पाणी टंचाईग्रस्त भागात पोचवले जात होते. त्यासाठी सर्वात शुद्ध पाणी म्हणून खोपोलीतील गगनगिरी मठ परिसरात पातळगंगा नदीतून पाणी उचलले जात होते. खालापूर पंचायत समितीने पाणी उद्भभवाचे ठिकाण म्हणून गगनगिरी मठानजीक नदीपात्राची निवड केली होती. मात्र झपाट्याने होणारे नागरिकरण, वाढणारी लोकवस्ती याचा परिणाम या उद्वभवावर झाला आहे. यंदा पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी या उद्धभवाची तपासणी केली असता, त्या ठिकाणी जलप्रदूषण वाढल्याचे लक्षात आले. त्यामुळे या ठिकाणच्या उद्धभव बंद करण्यात आला असून, त्याऐवजी चौक येथील खाजगी विहीर अधिग्रहीत करण्याची वेळ आली आहे. एकीकडे देशात नदी सफाई अभियान सुरु असताना खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीची झालेल्या दैनावस्थेमुळे भविष्यात तालुक्यावर मोठे पाणीटंचाईचे संकट येऊ शकते.

पाताळगंगा नदीवर अनेक घटक अवलंबून आहेत. नदीची प्रत्येकाने कुटुंबासारखी काळजी घेणे आवश्यक आहे. कचरा, टाकाऊ वस्तू नदीपात्रात टाकणे, शौचासाठी नदी किनारी जाणे टाळावे. सांडपाणी जर नदीत सोडले जात असेल तर कारवाई करण्याची गरज आहे.

-डॉ. शेखर जांभळे, संस्थापक, सहजसेवा फाउंडेशन-खोपोली

तालुक्यात यंदा टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी गगनगिरी मठाजवळील उद्भव बंद केला आहे. त्या ठिकाणी नदीपात्रात सांडपाणी मिसळले जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे डोणवत पायथ्याजवळ आणि चौक येथील खाजगी विहिरीतून टँकरने पाणी पुरवले जात आहे.

-एस. ढोले, पंचायत समिती, खालापूर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply