Breaking News

शिवसेनेचे हिंदुत्व ढोंगी

परवानगीत भेदभावामुळे भाजपचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमाच्या अनुषंगाने ‘ईद ए मिलाद’साठी मुंबई व उपनगरांत एकेक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

काँग्रेसला खुश करण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याकांचे पुन्हा एकदा लांगूनचालन करण्यात आले आहे. यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व किती ढोंगी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू संणांवर बंदी घालणार्‍या सेनेने ईद मिरवणुकीला मात्र परवानगी दिली. जनादेशाचा अनादर करून काँग्रेस सोबत सत्तेत बसायचे, शिवाजी पार्क उजळविण्याच्या नावाखाली इटालियन दिवे वापरून गांधी परिवाराला खुश ठेवायचे यातून जनाब सेनेची वाटचाल काँग्रेसच्या प्रकाशाखाली होत असल्याचे स्पष्ट दिसते.

उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून मुंबईत करोनाची तिसरी लाट येणार नसल्याचे मान्य करणार्‍या मुंबई महापालिकेने मात्र करोनाची भीती दाखवत करोडो हिंदुच्या श्रद्धेचा विषय असलेल्या दहीहंडी, गणेश उत्सव, गरबा साजरा करण्यास व देवीच्या मिरवणुका काढण्यास बंदी घातली. करोनाचे नियम पाळत या सणांना परवानगी द्या, अशी मागणी मी स्वतः व भाजपाने वारंवार करून सुद्धा शिवसेनेने या सणांवर बंदी तर घातलीच परंतु करोनाचे सर्व नियम पाळत सार्वजनिक पद्धतीने उत्सव साजरे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. परंतु याउलट अगोदर मोहरम आणि ईद मिरवणुक काढण्याला मात्र बिनदिक्कत परवानगी देण्यात आली.,असे भातखळकर म्हणाले.

हिंदुत्व हे काही सोयीच हत्यार नाही, पाहिजे तेव्हा काढायचे पाहिजे तेव्हा म्यान करायचे. हिंदुत्व ही चळवळ आहे, पण हिंदुत्वाची भूमिका मांडताना शिवसेनेची सध्या कसरत होत आहे. कारण एकाबाजुला संमिश्र विचारधारा असणारी कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या साथीने शिवसेनेला सरकार टिकवायचे आहे, तर दुसर्‍या बाजूला आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून शिवसेनेला आपले अस्तित्व सुद्धा टिकवायचे आहे, पण दुदैर्वाने शिवसेनेचा हिंदुत्वाचा पाया ढासळत चालला असून त्याला पुन्हा एकदा भक्कम करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हिंदुत्वारून शिवसेनेची भूमिका सध्या द्विधा मनस्थितीत सापडल्याचे चित्र दिसत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply