Breaking News

अलिबागच्या चिमुकल्या शर्विकाने सर केले गिरनार शिखर

अलिबाग : प्रतिनिधी

येथील चार वर्षीय बालगिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिच्या शिरपेचात आणखी  एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. तिने मंगळवारी (दि. 19) गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर केले आहे. हे शिखर सर करणारी शर्विका ही भारतातील पहिली कन्या ठरली आहे.

आपल्या बारा जणांच्या टीमसह शर्विकाने 18 ऑक्टोबरच्या रात्री 10.30 वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात केली. समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर ह्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी पायथ्यापासून सुमारे 10 हजार पायर्‍यांचा टप्पा पार करावा लागतो, घरापासून सुमारे 850 किलोमीटरचे अंतर, 17 तासांचा प्रवास, रात्रीचा जंगल प्रवास, पहाटेची बोचरी थंडी या सर्व अडथळ्यांवर मात करत शर्विकाने सुमारे साडेपाच तासांच्या अथक  परिश्रमानंतर पहाटे 4 वाजता गुजरातमधील सर्वोच्च गिरनार शिखरावर महाराष्ट्राचा स्वराज्य ध्वज आणि भारताचा राष्ट्र ध्वज फडकावला.

शर्विका मुळची अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची.  वयाच्या अडीच वर्षांपासून तिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति प्रेम निर्माण झाल्याने तिने आई-वडिलांसोबत गड, किल्ले सर करण्यास सुरुवात केली. शर्विकाने महाराष्ट्रातील माथेरानमधील कलावंतीण सुळका  वयाच्या अवघ्या अडीचव्या वर्षात सर केला. नाशिकमधील साल्हेर  किल्ला तिसर्‍या वर्षात, कळसुबाई शिखर वयाच्या  साडेतीन वर्षांत सर केला. मंगळवारी तिने गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर करून आपल्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन वेळा, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन वेळा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन दोन वेळा तर ओ माय गॉड आणि डायमंड बुक रेकॉर्ड अशी दहा रेकॉर्ड शर्विकाच्या नावावर आहेत. तर आता तिने सर केलेल्या गिरनार मोहिमेची इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंद होणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply