Breaking News

पटोलेंचे धक्कातंत्र सुरूच; काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्याचे पक्षातून निलंबन

अहमदनगर : प्रतिनिधी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सचिन सावंत यांना मुख्य प्रवक्ते पदावरून डच्चू दिल्यानंतर पक्षातील आणखी एका नेत्याला धक्का दिला आहे. यावरून काँग्रेस पक्षातील खळबळ सुरू असल्याचे दिसत आहे. पटोले यांनी आता अहमदनगरमधील पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि विविध पदांवर काम केलेल्या बाळासाहेब भुजबळ यांना पक्षातून अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. भुजबळ यांनी केलेला खुलासाही अमान्य करण्यात आला आहे. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेले शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासोबत भुजबळ यांचे पटत नव्हते. भुजबळ यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी 8 सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शहर जिल्हा काँग्रेसने आयटी पार्कप्रकरणी घेतलेल्या भूमिकेविरोधात केलेली जाहीर पत्रकबाजी, मनपा तिप्पट करवाढीच्या संदर्भात पक्षविरोधी भूमिका घेत मनपात केलेले आंदोलन, असे विविध आरोप भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आले होते. याबाबत भुजबळ यांनी उबेद शेख, श्याम वागस्कर, फिरोज शफी खान, अभिजित कांबळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष पटोले यांची मागील आठवड्यात मुंबईत भेट घेऊन आपला खुलासा सादर केला होता. भुजबळ यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे सांगत त्यांना पक्षातून निलंबित केल्याचे पत्र प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी दिले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply