पनवेल ः प्रतिनिधी
सोमवार 17 जूनची सकाळ जराशी वेगळी होती…. त्याला कारणेही दोन होती…. एक तर प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणार्या पावसाने हजेरी लावली होती आणि दुसरीकडे जागोजागी रस्त्यावर किलबिलाट दिसत होता, पण हा किलबिलाट पक्ष्यांचा नव्हता, तर हा किलबिलाट होता विद्यार्थ्यांचा.. सकाळपासून शाळेचा नवा गणवेश घालून नवे दप्तर सांभाळत ही मुले शाळेत येत होती. कोणाला पालक स्कूटरवरून, कोणी गाडीतून, तर कोणी पालकांचा हात धरून चालत येत होते. दीड-दोन महिन्यांची उन्हाळी सुटी संपल्यानंतर आजपासून अनेक शाळा सुरू झाल्या. त्यामुळे इतके दिवस ओस पडलेल्या शाळा गजबजल्या होत्या. नवे वर्ग.. नवे मित्र-मैत्रीण.. नवा अभ्यास.. नवे शालेय साहित्य घेऊन नवा ध्यास घेत विद्यार्थी आपल्या पालकांच्या मदतीने शाळेत पोहचत होते. कोणी रडत होते, तर कोणी हसत येत होते. प्रत्येकाच्या चेहर्यावरील वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या. त्यांच्या भावमुद्रा खूपच गमतीशीर होत्या. सोमवारी सकाळी कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर स्वत: विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेत आले होते. त्यांनी फुले देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका स्वपना म्हात्रे उपस्थित होत्या.धाकटा खांदा येथील मनपा शाळा क्रमांक 6 मध्ये सकाळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख उपायुक्त जमीर लेंगरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper