Breaking News

शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर मोकाट गुरांचा वावर

अपघातांत वाढ, वाहनांच्या धडकेत गुरांचा मृत्यू

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील मुख्य मार्गावर सध्या मोकाट गुरांच्या समस्येने डोके वर काढले आहे. गुरांचा वाढता उपद्रव प्रवासी व वाहनचालकांना डोकेदुखी ठरतोय. शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर ठिय्या मांडून बसणारी व रास्ता रोको करणारी गुरे प्रवासी, वाहनचालक व नागरिकांसमोर डोकेदुखी ठरत आहे. हा मार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. रस्त्यातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे हा मार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशातच या मार्गावर मोकाट गुरांचा सातत्याने रास्ता रोको होत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.

मोकाट गुरांचे जथ्थे दिवसा व रात्री या मार्गाच्या मधोमध ठाण मांडत असल्याने जीवघेण्या अपघाती घटनांना निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर रस्त्यात बसलेल्या गुरांना धडकून अनेकदा अपघाती घटना घडल्या आहेत. या मार्गावर गुरांच्या झुंज लागत असल्याने प्रवाशांना याचा अधिक धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे गुरे मालकांनी आपापली गुरे मोकळी न सोडता त्यांची योग्यप्रकारे निगा राखावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांमधून जोर धरत आहे. शिहू नागोठणे परिसरात मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरील मोकाट गुरांची वाढती समस्या डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडीची समस्यादेखील निर्माण होताना दिसत आहे, तर रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार व वाहनचालकांना रस्त्यात बसलेली गुरे दिसत नसल्याने अनेकदा अपघाती घटना घडल्या आहेत, तसेच अवजड वाहनांच्या धडकेत गुरांचा बळी जाण्याची देखील शक्यता असते.

अशातच वाहनचालकांनी कितीही हॉर्न वाजविला तरी मोकाट गुरे जागची हालत नसल्याने यातून वाट कशी काढायची, असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा राहत आहे. मोकाट गुरांचे मालक व शेतकरी गुरांचा वापर करून काम झाल्यावर बेफिफिकरपणे वागत आहे. सदरची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत असून प्रशासनस्तरावर उपाययोजनेच्या दृष्टीने कोणतेच पाऊल उचलले जात नाही.

रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली महामार्ग, खोपोली-पेण-अलिबाग मार्ग, शिहू-नागोठणे-पोयनाड, तसेच वाकण-पाली-खोपोली मार्गावर मोकाट गुरांची समस्या गंभीर झाली आहे. सदर मार्ग प्रवास व वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असावा याकरिता मालकांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत.

याबरोबरच शासन प्रशासनाने देखील रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

मोकाट जनावरे रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनचालकांना अडथळा येतो. आजवर या मार्गावर झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील मोकाट जनावरे न दिसल्यामुळे बर्‍याचदा असे अपघात होतात, तसेच मोठ्या वाहनांची धडक लागून गुरे देखील मृत्युमुखी पडतात. त्यामुळे मोकाट  फिरणार्‍या या जनावरांना मालकांनी मोकाट सोडू नये. त्यांची चारापाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी.

-दीपक दाभाडे, नियमित प्रवासी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply