Breaking News

गटार स्वच्छतेबाबत पोशीर ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पोशीर गावामधील प्रकाश भाऊ राणे यांच्या घरासमोरील सार्वजनिक गटाराची गेल्या अनेक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेरळ-कळंब रस्त्यालगत पोशीर गावात प्रकाश भाऊ राणे यांचे घर आहे. या घराला लागून सार्वजनिक गटार आहे. मात्र या गटारांची स्वच्छता करण्याऐवजी पोशीर ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राणे यांनी या समस्येबाबत ग्रामपंचायतीला अनेकदा लेखी अर्ज दिले आहेत, मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. कोविडची परिस्थिती असतानादेखील गटाराची साफसफाई केली जात नसल्याचा आरोप तक्रादार राणे यांनी केला आहे. दरम्यान, राणे यांनी 19 एप्रिल रोजी पत्र देऊन गटार साफ करा, अन्यथा आमच्या सर्व्हे नंबरमधील रस्ता बंद करावा लागेल, असे ग्रामपंचायतीला लेखी कळविले होते. तरीही गटार साफ न झाल्याने राणे यांनी रस्ता तसेच गटार तात्पुरते बंद केले. या कृतीची गांभीर्याने दखल घेत ग्रामपंचायतीने प्रकाश राणे यांना सार्वजनिक रस्ता बंद केल्याबद्दल नोटीस पाठविली आहे व रस्ता दोन दिवसांत खुला न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

गटारातील सांडपाणी शेतात जात असल्याने गटार साफ करण्यात अडचण निर्माण झाली आहे. हे गटार ओहळापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. निधी उपलब्ध नसल्याने काम थांबले आहे, परंतु दोन दिवसांत तात्पुरते स्वच्छ करू.

-अनिल जोशी, सदस्य

ग्रामपंचायतीला लेखी अर्ज करूनही गटार साफ केले नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून रस्ता व गटार तात्पुरत्या स्वरूपात बंद करावी लागली आहे. त्याबद्दल नोटीस काढण्यात आली आहे. मग गटार स्वच्छतेचे काम अडवणार्‍या व्यक्तींना नोटीस का बजावली जात नाही. ग्रामपंचायत प्रशासन राजकारण करीत असून, त्याचे आम्ही बळी ठरलो आहोत.

-प्रकाश भाऊ राणे, तक्रारदार ग्रामस्थ, पोशीर, ता. कर्जत

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply