पाली नगरपंचायतीचा इशारा
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. मात्र मास्क न घालणार्या व कोरोना नियमांचे पालन न करणार्यांवर दंडात्मक करवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 27) दिली.
धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत, शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत तसेच तोंडावर आलेला दिवाळी सण या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना दिल्या जात असल्या तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आहे. अष्टविनायक क्षेत्र असलेल्या पालीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत.
सुधागड तालुक्यातील पाली, पेडली, परळी या बाजारपेठांत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र बहुसंख्य नागरिक कोरोनाविषयक नियम धाब्यावर बसवून फिरताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार तथा पाली नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी नागरिकांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. या काळात नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी प्रशासकीय व नगरपंचायत कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागरिकांनी खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करू नये. विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच व्यापार्यांना नियमावली पाळण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली, सुधागड
नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी. स्वतः बरोबरच इतरांनाही संसर्ग व त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
-डॉ. शशिकांत मढवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुधागड