कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत आगारातील सर्व कार्मचार्यांनी गुरुवारी (दि. 28) काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कर्जत आगारातून एकही एसटी गाडी बाहेर पडली नाही.
राज्यातील एसटी कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. वेतनवाढ आणि राज्य शासनात विलिनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी कृती समितीचे बुधवारपासून राज्य व विभागीय पातळीवर आंदोलन सुरू आहे. कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय संप पुकारण्यात आला असून, कर्जत आगारातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने गुरुवारी एकही एसटी गाडी बाहेर पडली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
कर्जत एसटी आगारातील एसटी कामगार संघटना, इंटक कामगार संघटना आणि कामगार सेना या संघटनांच्या सर्व सदस्यांनी गुरुवार सकाळपासून आंदोलन सुरू केले होते. कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश जाधव, सचिव नागेश भरकले, इंटक कामगार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर किरंडे, सचिव सुरेश पाटील आणि एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष बबन ऐनकर, सचिव विशाल गेडाम यांच्यासह तिन्ही संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.
कर्जत आगारातील कोणत्याही कर्मचार्याने गुरुवारी दिवसभरात ड्युटी केली नाही. त्यामुळे बंद 100 टक्के यशस्वी झाला, असा दावा तिन्ही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला.