पनवेल ः रामप्रहर वृत्त
दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात साकारलेल्या रामबाग या निसर्गरम्य उद्यानाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. 22) श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या वेळी त्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी मंत्री व आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग 14 एकर जागेत पसरली आहे. या उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह फुलझाडांच्या विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉईंट, मचवा, पाण्याचे कारंजे अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते. त्या वेळी तेथील विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडते. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
रामबाग उद्यानाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद, तर रात्री 8 वाजता पप्पू सूर्यराव, स्टेप आर्ट इंटरटेन्मेन्ट निर्मित आणि सनी संते प्रस्तुत ’हिच खरी आगरी कोळ्यांची दौलत’ हा पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी केले आहे.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper