नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोपरखैरणे व वाशी येथे माहिती तंत्रज्ञानाचे जाळे उभे राहिल्याने या शहराची ओळख सायबर सिटी म्हणून पुढे आली होती. आता ‘फ्लेमिंगो सिटी’साठी पालिका आणि काही खासगी संस्था प्रयत्न करणार आहे. ठाणे वन विभागाच्या वतीने ऐरोली येथे सुरू करण्यात आलेल्या सागरी जैवविविधता केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणार्या रोहित पक्षी (फ्लेमिंगो) निरीक्षणाला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादाला अधिक चालना देण्यासाठी नवी मुंबई पालिकाही या आकर्षक पक्ष्याच्या निरीक्षणासाठी मचाण उभारण्याचा प्रस्ताव तयार करीत आहेत्
राज्याच्या वन विभागाने ठाणे वन क्षेत्रावर ऐरोली खाडी पुलाजवळील मोकळ्या जागेत सागरी जैवविविधता केंद्र उभारले आहे. या केंद्रातून नोव्हेंबरनंतर फ्लेमिंगो दर्शनासाठी छोट्या फेरीबोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा आता या जैवविविधता केंद्राकडे वाढला आहे. नवी मुंबई क्षेत्राला मिळालेल्या या फ्लेमिंगो पक्ष्याच्या अधिवासाचा उपयोग पर्यटन विकसित करण्यासाठी करण्याचा पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे.
नवी मुंबई हा खाडीकिनारा भाग असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात हजारो मैलांचे अंतर पार करून नवी मुंबई, उरण या भागांत येत असल्याचे दिसून आले आहे. ओहोटीनंतर मोकळ्या होणार्या खाडीच्या भूभागावर या पक्ष्याचे खाद्य असल्याने या पक्ष्यांचे थवेच्या थवे या भागात पाहण्यास मिळतात. फ्लेमिंगो पक्ष्याचा हा सहवास महामुंबईच्या इतर क्षेत्रांत नाही. त्यामुळे वन विभागाप्रमाणेच नवी मुंबई पालिकेनेही या प्लेमिंगो पक्ष्याच्या निरीक्षणासाठी काही जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
वन विभागाच्या परवानगीने त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण स्थळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. वाशी येथील सीशोअर परिसरात अशा प्रकारची निरीक्षण ठिकाणे उभारता येण्यासारखी आहेत. ही निरीक्षण ठिकाणे सेल्फी पॉइन्ट म्हणूनदेखील विकसित केली जाणार आहेत.
नवी मुंबईची ओळख भविष्यात फ्लेमिंगो सिटी म्हणून व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाच्या परवानगीने त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण स्थळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यातून पर्यटनाला चालना मिळेल.
-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका