Breaking News

वाहतूक कोंडीने महाड गुदमरतंय!

महाड शहरातले रस्ते हे वाहतूक कोंडीचे जाळे झाले आहे. बेकायदेशीर पार्किंग आणि विक्रेत्यांमुळे शहरातील मुख्य मार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नगरपालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस यंत्रणा या वाहतूक कोंडीतून महाडकरांची सुटका करण्यात अपयशी ठरले आहेत. महाड शहरात दोन प्रमुख मार्ग आहेत. एक महात्मा गांधी मार्ग आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग. हे दोन्ही मार्ग महाडच्या पुर्व आणि पश्चिम दिशेने आहेत. हे दोन वाहतुकीचे प्रमुख मार्ग आहेत. महाडच्या जुन्या बाजार पेठेतून सुरु होणारा महात्मा गांधी मार्ग हा नवी पेठ आणि आताचा कपडा मार्केट मार्गे नवेनगर, सिव्हील हॉस्पिटल करुन शेडाव नाक्याजवळ मुंबई-गोवा महामार्गाला जावून मिळतो. जुनी बाजार पेठ जरी कालानुरूप मागे पडली असली तरी या भागात व्यापार्‍यांचे गोडाऊन मोठ्या प्रमाणात आहेत तसेच या ठिकाणी आजकाल घाऊक मालाची खरेदी होत असल्या कारणाने या मार्गावर अवजड वाहने येत असतात. तसेच पुर्वीपासून एकेरी वाहतूक म्हणजे वन-वे असूनही रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने हा मार्ग सतत वाहतूक कोंडीग्रस्त असतो. महाड शहरातील दूसरा महत्वाचा मार्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हा मार्ग पानसार मोहल्यापासून सुरु होतो. मुस्लिम वस्तीत हा प्रमुख मार्ग अरुंद आणि गल्लीसारखा झाला आहे, पुढे चवदार तळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे एसटी स्टॅडपर्यंत जातो.  वर्दळीचा आणि रुग्णवाहिकांची ये-जा असणार्‍या या मार्गावर आजकाल बेकायदेशीर वाहन पार्किंग केले जाते. जिजाऊ उद्यान येथील रस्त्यावरील विके्रत्यांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी तर महाडकरांची डोकेदुखी झाली आहे. महाड शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, कोणताच अधिकारी यावर मार्ग शोधू शकलेला नाही. महाड शहर पोलीस निरीक्षकांनी शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले होते, त्याला आता महिना उलटून गेला आहे. शहरातील वाहतूक कोंडीबाबत कोणतेच पाऊल उचलले गेलेले नाही. त्यातच शहर पोलीस ठाणे आणि पोलीस उपविभागीय कार्यालयासमोरच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा गराडा पडत आहे. वाहन पार्किंगला जागाच नसल्याने यामध्ये पोलीस किंवा वाहनचालकांची कोणतीच चूक नाही. मात्र दुचाकी वाहन पार्किंग करिता शिस्तबद्धता आणल्यास येणार्‍या आणि जाणार्‍या वाहनचालकांना कोणताच त्रास होणार नाही. तालुक्यातील नागरिक आपली समस्या सोडवण्यासाठी महाड शहर पोलीस तसेच महाड महसूल कार्यालयात येत असतात. विविध दाखले, जमीन खरेदी विक्री व्यवहार, पोलीस ठाण्याशी निगडीत प्रश्न आदीसाठी नागरिक प्रतिदिन याठिकाणी येतात. मात्र या ठिकाणी त्यांना वाहन उभे करण्यास जागा नसल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. शहरातील चवदारतळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सारस्वत बँक गल्ली, एसबीआय बँक, आदित्य नर्सिंग होम, देशमुख हॉस्पिटल, जिजामाता उद्यान, भगवानदास बेकरी, लायन्स क्लब, वेलकम हॉटेल, आरडीसी बँक, नवेनगर एपल प्लाझा, तांबट आळी या भागातही पार्किंग आणि वाहतूक कोंडीची  समस्या भीषण आहे. महाड महसूल कार्यालया शेजारीच दुय्यम निबंधक कार्यालय, न्यायालय, पोलीस उपविभागीय कार्यालय, शहर पोलीस ठाणे तसेच पुरवठा कार्यालय अशी विविध कार्यालये आहेत. ब्रिटीशकालीन इमारत आणि त्या वेळच्या लोकसंख्येच्या आधारे येथील इमारत आणि जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र अलिकडच्या काळात या परिसरात नागरी वस्ती वाढली आहे. शिवाय महाडचे ग्रामदैवत जाकमातेचे मंदिरदेखील याच भागात आहे.  या ठिकाणी येणारे भाविकदेखील याच रस्त्यातून वाट काढत पुढे जात असतात. या परिसरातील नागरिकांना देखील वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही वेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे राहतात मात्र वाहन चालक बेशिस्तीचा धडा गिरवण्याचे सोडत नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी राहतात. त्याचा त्रास महसूल व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनादेखील सहन करावा लागत आहे. याकरिता नव्या प्रशासकिय इमारतीची गरज आहे. त्याचा शासनाने विचार करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. महाड शहर पोलीस ठाण्याच्या समोरील वाहन पार्किंगचा प्रश्न सुटत नसल्याने शहरातील समस्या कशा सुटतील असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

-महेश शिंदे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply