- अलिबागच्या सहाण गोठीमधील घटना
- ग्रामस्थांनी चोपून केले पोलिसांच्या हवाली
अलिबाग ः प्रतिनिधी
दिवाळीतील पिस्तुलाचा धाक दाखवून अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी परिसरात लोकांना लुटण्याचा प्रयत्न चार चोरट्यांच्या अंगलट आला आहे. गावकर्यांनी त्यांची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या हवाली केले. या चोरांकडून आठ मोबाइल, रिक्षा, आणि पिस्तुल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अलिबाग तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांच्या सुळसुळाट झाला असून सहाण गोठी परिसरात चार चोर रिक्षा घेऊन हत्यारासह आल्याचे कळले. त्यामुळे ग्रामस्थ सावध होऊन या चोरांचा माग घेऊ लागले. त्या वेळी दोन जण ग्रामस्थांच्या हाती लागले आणि उर्वरित दोघे जंगल भागात पळाले. गावकर्यांनी त्यांनाही पकडून येथेच्छ चोप दिला. या वेळी चोरट्यांकडे तपासणी केली असता एक पिस्तुल, आठ मोबाइल असा ऐवज सापडला. पिस्तुल पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. त्यांनी चोरांना अलिबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.
अलिबाग पोलिसांनी पिस्तुलची तपासणी केली असता, ते दिवाळीत फटाके फोडण्यासाठी वापरले जाणारे खेळण्यातील असल्याचे समजले. खेळण्यातील पिस्तुलचा धाक दाखवून चोरट्यांचा डाव होता, मात्र तो उधळला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.