अलिबाग : प्रतिनिधी
मागील दोन पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झाले. उभी पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. हाती आलेले भातपीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गुरुवार संध्याकाळपासून पावसाने सुरुवात केल्याने भातपिकाची पुरती वाताहत झाली असून शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागते आहे. झोडण्यासाठी, मळणीसाठी तयारी केली होती, परंतु अचानक अवकाळी पावसाने जोरदार दणका दिल्याने शेतात कापून ठेवलेली भाताची कणसे, तसेच भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पुरते भिजून गेल्याने शेतकर्यांचे पुरते नुकसान झाले आहे, तसेच पावसाने झोडपून काढल्याने तयार शेती शेतातच कोलमडली असून भातपिकाच्या नुकसानीस शेतकरी वर्गास सामोरे जावे लागले आहे. पावसाच्या दणक्याने शेतकर्यांच्या हाती आलेले उभे पीक वाया गेले असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
परतीच्या पावसाने विस्कळीत झालेल्या शेतीचे दृश्य सर्वत्र दिसत असून पाऊस थांबून सूर्यप्रकाशाची वाट शेतकरी वर्ग पाहात आहे. जर पावसाचा खेळ असाच सुरू राहिला, तर शेतकरी वर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. परतीच्या पावसाने शेतकरी वर्गास नुकसानीस समोरे जावे लागले असून शासनाने याची त्वरेने दखल घ्यावी व नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने भाताचे पीक खूपच चांगले आले होते. शेतकर्यांनी कापणीबरोबरच झोडणीला सुरुवात केली होती. मनुष्यबळाची कमतरता आणि दिवाळीचा सण यामुळे शेतकर्यांनी दोन दिवस कामे थांबवली होती. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेले दोन दिवस पाऊस बरसला आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. आता हा भिजलेला भात कोण खरेदी करणार याची चिंता शेतकर्यांना भेडसावते आहे.