Breaking News

मर्यादित वेळेसाठी लोकलसेवेचा निर्णय दिशाहीन आणि हास्यास्पद

भाजपची सडकून टीका

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटामुळे सुमारे 10 महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे, मात्र प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसे पत्र राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिले आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना ठरावीक वेळेतच प्रवास करता येणार आहे. दरम्यान, यावरून आता भाजपने राज्य सरकारवर टीका केली. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकारचा हा निर्णय दिशाहीन आणि हास्यास्पद असल्याचे म्हणत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय केवळ धूळफेक असून सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असते. केवळ रात्री व दुपारी प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक आहे, असे भातखळकर म्हणाले.
कोरोनामुळे लोकल बंद करून आज 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यास कोरोना वाढेल असे कारण देणार्‍या ठाकरे सरकारने दुसरीकडे मात्र मद्यविक्रीची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, बाजारपेठा, बसेस, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षांच्या सभा आदी सर्व सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील उपनगरे व शेजारील शहरांमध्ये राहणार्‍या चाकरमान्यांना रस्त्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यातही पूर्व व पश्चिम महामार्गावर होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी लोकलसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केल्याचा घणाघातही भातखळकर यांनी केला.
…तर आंदोलन करणार
राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेवून सर्वसामान्यांसाठी तत्काळ लोकल सुरू करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारादेखील भातखळकर यांनी दिला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply