कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील सेक्टर 34 मधील शिवकृपा सोसायटीच्या आवारात बाल मावळ्यांनी दिवाळीनिमित्त किल्ला निर्माण केला आहे. शिवकृपा सोसायटीचे शेखर जगताप, सुधीर काठमोरे, सुनील राळे, मिलिंद पारकर आणि इतर सर्व रहिवाशांनी या बाल मावळ्यांना प्रोत्साहन दिले.
दसर्यानंतर सर्वांनाच दिवाळीची उत्सुकता लागते आणि त्याच वेळेस शाळकरी मुलांना किल्ले बनवण्याचे वेध लागतात. खरं म्हणजे दिवाळी सुटीत किल्ले बनवण्याची सुरुवात कोणी आणि कधी केली हे जरी माहीत नसले तरी सुटीत बनवल्या जाणार्या किल्ल्यामुळे नक्कीच शाळकरी मुलांना महाराष्ट्राच्या वैभव शाली इतिहासाची ओळख होते आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक होत असते.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य निर्माण केले. किल्ले तयार करण्याच्या निमित्ताने लहान मुलांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नक्कीच ओळख होते आणि महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती आली महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याचा तेदेखील नकळतपणे प्रयत्न करू लागतात.
खरे म्हणजे आज कालची शाळकरी मुले टीव्हीवरील कार्यक्रम आणि मोबाइलवरील आभासी खेळांमध्ये अडकून पडले आहेत. मातीचे किल्ले बनवण्याच्या निमित्ताने ते त्या टीव्ही आणि मोबाइलच्या पडद्याच्या कैदेतून नक्कीच बाहेर पडतात.
कामोठे येथील सेक्टर 34 मधील शिवकृपा सोसायटीच्या आवारात बाल मावळ्यांनी देखील किल्ला निर्माण केला आहे. सुमित काठमोरे, निहित बामणे, शुभम बेहनवाल या लहानग्यांनी किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची लहानशी, परंतु रुबाबदार सिंहासनाधिष्ठित मूर्तीदेखील स्थापन केली. त्याचबरोबर किल्ल्यावर संरक्षणासाठी तोफा तलवारी आणि भाले या पारंपारिक शस्त्रांनिशी सज्ज मावळेदेखील उभे केले. किल्ल्याच्या परिसरात गोधन, शेती, विहीर, कुस्ती खेळणारे मल्ल, तुळशी वृंदावन यांची सुंदर सजावट केली आहे.