Breaking News

पर्यटकांसाठी माथेरान अखेर खुले

कर्जत : बातमीदार
साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर 2 सप्टेंबरपासून माथेरान पर्यटनस्थळ सर्व पर्यटकांसाठी खुले झाले  आहे. राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेनच्या नव्या परिपत्रकानुसार रायगड जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्ये वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माथेरान हे 17 मार्चपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. साडेपाच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉक-4मध्ये माथेरान अखेर पर्यटकांसाठी खुले होत आहे. यामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे. पर्यटकांसाठी ही आनंदाची बाब मानावी लागेल. पर्यटन सुरू होत असताना येणार्‍या पर्यटकांनी शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत माथेरानमध्ये यावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले आहे.
माथेरान पर्यटकांसाठी खुले झाल्याची माहिती सोशल मीडियावरून समजताच काही पर्यटकांनी माथेरानमध्ये हजेरी लावली. पहिल्याच दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत 20 पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत.
टॅक्सीचालक मदत देण्याची मागणी
कर्जत : माथेरान येथील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले नेरळमधील 450 टॅक्सीचालक व त्यांचे कुटुंबीय मेटाकुटीस आले आहेत. त्यांना राज्य शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्यामुळे सर्व व्यवसायांवर गदा आली. देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे माथेरान हे पर्यटनस्थळ 17 मार्चपासून बंद होतेे. पर्यटकांअभावी येथील टॅक्सी व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेली नेरळमधील टॅक्सीचालकांची एकूण 450 कुटुंब पाच महिन्यांनंतरही माथेरान बंद असल्याने उपासमारीमध्ये जीवन जगत आली आहेत. एकीकडे पोटाची चिंता आणि दुसरीकडे गाडीसाठी घेतलेल्या कर्जाची विवंचना अशा दुहेरी कात्रीत ते अडकले आहेत, मात्र राज्य शासनाने कोणत्याही स्वरूपात मदत केलेली नाही.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply