देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल
देशातील 25 राज्यांनी इंधनाचे भाव कमी केले!

मुंबई ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करीत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने व्हॅट कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, ही मागणी लावून धरली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यावर देशभरात पट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 5 व 10 रुपयांनी कपात झाली आहे. त्यानंतर देशातील अनेक राज्यांनी व्हॅट कमी केला असून त्या प्रत्येक राज्यात पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्यापही व्हॅट कमी करण्यात आला नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये कमी केल्यावर 25 राज्यांनी ते दर आणखी कमी केले. महाराष्ट्रात का नाही?,’ असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. या संदर्भात त्यांनी नुकत्याच झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारवर टीका केली होती.
काँग्रेसचीही मुख्यमंत्र्यांकडे करकपातीची मागणी
मुंबई ः केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला, त्याच पद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात खान यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच राज्यातील जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा.