Breaking News

जय श्रीराम

आज चैत्र शुद्ध नवमी. अर्थात रामनवमी. हजारो वर्षापूर्वी याच भूमीत भगवान विष्णूने प्रभू रामचंद्राच्या रूपात अवतार घेऊन जगाचे कल्याण केले होते. त्या भगवान रामाचे अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प तमाम भारतीयांचा आहे. तो संकल्प तडीस नेणार्‍यांना साथ द्या. एवढीच अपेक्षा या रामनवमीच्या निमित्ताने रामभक्तांकडे.

आज श्री रामजन्मोत्सव. एकवचनी, एकबाणी असे ज्याचे वर्णन केले जाते त्या अयोध्यापती भगवान श्रीराम यांचा हा जन्मोत्सव अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा हजारो वर्षापासून भारतासह विदेशातही जोपासलेली आहे. त्यामुळे हिंदू धर्मात या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व अनादिकालापासून प्राप्त झालेले आहे. अशा या भगवान श्रीरामाचे अयोध्येत भव्य मंदिर असावे अशी तमाम हिंदू धर्मियांची मनापासूनची अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्याचा निर्धार सत्ताधारी भाजपने केलेला आहे. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या जाहीरनाम्यात अर्थात संकल्पपत्रात देखील अयोध्येत राममंदिर उभारणीचा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो संकल्प तडीस जाण्यासाठी देशाची सूत्रे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि मित्रपक्षाच्या हाती सोपविणे हे प्रत्येक मतदाराचे परमकर्तव्य आहे. ते कर्तव्य प्रत्येक जागरूक मतदाराने पार पाडले, तर आगामी काळात अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य असे मंदिर उभारणे शक्य होणार आहे. भाजपच्या प्रत्येक निवडणुकीत श्रीराम मंदिराच्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आलेला आहे. मागील पाच वर्षे या संदर्भात ज्या काही न्यायप्रविष्ठ बाबी आहेत त्या मार्गी लावण्यात विद्यमान मोदी सरकार पूर्णपणे यशस्वी ठरलेले आहे. अजूनही अनेक न्यायप्रविष्ठ बाजू न्यायदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचाही यथायोग्य निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व न्यायप्रविष्ठ बाजू योग्य तर्‍हेने पडताळून देशातील हिंदू आणि मुस्लिम समाजाला पूर्णपणे विश्वासात घेऊनच मोदी सरकार राममंदिराची उभारणी करू इच्छिते. त्यावरून कुठल्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण होऊ नये अशीच या सरकारची प्रांजळ अपेक्षा आहे. त्यासाठी विलंब लागला तरी हरकत नाही, पण न्यायदेवतेचा योग्य तो आदर राखून, देशातील ऐक्य अबाधित राखत प्रभू रामचंद्रांचे जगालाही दीपविणारे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प मोदी सरकारचा आहे. त्या संकल्पाला तडीस नेणे हे प्रत्येक भारतीयाचे परमकर्तव्य आहे. त्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार पुन्हा देशात सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे. काँग्रेसवाल्यांना अयोध्येत राममंदिराची उभारणी करायची अजिबात इच्छा नाही. उलट ते प्रकरण प्रलंबित कसे राहील हेच धोरण काँग्रेसने आजपर्यंत अवलंबिले. त्यामुळे अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा अनेक वर्षे असाच प्रलंबित राहिला आहे. भाजपने मात्र तो मुद्दा सातत्याने लावून धरला आणि तो आता अंतिम टप्प्यात येऊ लागला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात अयोध्येत राममंदिराची उभारणी करण्यात भाजप सरकार निश्चित यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. यासाठी मतदार राजा जागा राहा आणि योग्य तो निर्णय घेऊन देशाची सूत्रे कोणाच्या हाती सोपविली म्हणजे आपल्या स्वप्नातील राममंदिर उभारले जाईल हे लक्षात ठेव, इतकेच.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply