आमदार महेश बालदी यांची गर्जना
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त
पेण अर्बन बँक व कर्नाळा बँक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी दिल्लीचेही प्रसंगी तख्त हलवू, असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले. ते मोहोपाडा येथील पाटील हॉलमध्ये गुरुवारी (दि. 11) रसायनी विभाग आयोजित दीपावली व नूतन वर्षाच्या स्नेह मीलन समारंभात उपस्थित व्यापारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलत होते.
व्यापारी वर्गाशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी उरण तालुका व्यापारी असोसिएशनचा 10 वर्षे अध्यक्ष आहे.व्यापार्यांना कोणी दादा, गुंड कोणीही दमदाटी करत असेल, तर मला फोन करा. पण एखाद्या व्यापार्याने खरोखरच वाईट काम केले असेल आणि त्याला शिक्षा होत असेल, तर ते योग्यच आहे. व्यापार्यांची वज्रमूठ अतिशय घट्ट असली पाहिजे, असेही आमदार बालदी म्हणाले. कोविड काळात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी हे स्वतःचे कायदे काढत होते. त्यांच्या स्वतःच्याच घरी कोरोना झाल्यासारखे वागत होते. बँक ठेवीदारांना ठेवीसंदर्भात बोलत होते की, दोन-तीन महिन्यांत पैसे मिळतील. येवढे सोपे नाही, आम्ही दोन-तीन वेळा अर्थमंत्र्यांची भेट घेतलेली आहे.आरबीआयचे अधिकारी यांचीही भेट घेतली आहे. एक लाखाचा इन्शुरन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच लाखांचा केला. याबाबत सखोल माहिती घेऊन उत्कृष्ट वकिलांची टीम बनवून ठेवीदारांना न्याय मिळवून देणार, असे यरा वेळी आमदार महेश बालदी यांनी आश्वासन दिले.
या वेळी मराठा आरक्षण समितीचे विनोद साबळे, प्रवीण खंडागळे, तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, तालुका सहसचिव प्रवीण जांभळे, तालुका कार्यकारिणी सदस्य भरत मांडे, भाजपचे वासांबे अध्यक्ष सचिन तांडेल, चांभार्ली पंचायत समिती अध्यक्ष भूषण पारंगे, उपाध्यक्ष प्रमोद जांभळे, वासांबे पचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, व्यापारी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष रजनिश शहा, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज सोमाणे, सचिव अमित शहा, माजी सरपंच अविनाश गाताडे, माजी उपसरपंच अमित मांडे, महादेव कांबळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, भाताणचे तानाजी पाटील आदींसह भाजपचे परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासांबे जिल्हा परिषद भाजपचे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल व त्यांच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले.