माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात बुधवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. माणगावात बुधवारी पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपारी चार वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा जाणवत होता. नंतर सायंकाळी पाऊस थांबल्याने वातावरणात उष्णता जाणवत होती. या अवकाळी पावसात शेतात रचून ठेवलेल्या मळण्या भिजल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
श्रीवर्धन : तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला, तो बुधवारी दुपारीे 12 वाजले तरी पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचार्यांना यश आले नव्हते. दिवाळीच्या दिवशीदेखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला होता. त्या वेळीही सुमारे पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या वेळी रानवली धरणाजवळील 12 खांबांवर वीज पडल्याने श्रीवर्धनचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाला होता, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता वाकपैंजण यांनी दिली. हा वीजपुरवठा दुपारी साडेबारा वाजल्यानंतर पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचार्यांना यश आले. वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे लघुउद्योजक व पर्यटन व्यवसायिकांचे नुकसान होते. महावितरणने पाभरे ते श्रीवर्धन या मार्गावर भूमिगत वीजवाहिन्यांचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात मागील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण होते. बुधवारी (दि. 17) पहाटे मेघगर्जनेसह पावसाचा शिडकाव झाला. अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार म्हसळ्यामध्ये बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील आंबा, काजूसह रब्बी पिकाचे (वाल, चवळी, मूग व कडधान्ये) नुकसान होते की काय असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. म्हसळा तालुक्यात काजू पिकाला चांगला मोहोर आला आहे तर आंबा पिकालाही काही दिवसांत मोहोर येण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवस हवामान ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे.