
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
रुग्णालयातील जैविक कचर्याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगाव येथे येऊ घातला असून जैविक कचर्यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत अनेक आजारांमुळे जीवनमान कमी होणार असल्याची भिती व्यक्त होत होती. त्यामुळे बुधवारी (दि.17) खोपोलीतील सॅम्युअल मॉल येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या वेळी 500 संख्येने महिला, युवक, युवती उपस्थित राहून कारखाना आमच्या गावात नको, एसएमएस कंपनीचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी करीत आक्रमक पवित्रा घेण्यात आला.
जनसुनावणी उधळून लावण्याचा प्रयत्न असतानाच खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोली, पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढीत जनसुनावणी सुरू करताच, ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित करताच कंपनीच्या एजेन्सीची बोलती बंद झाली.
खालापूर तालुक्यातील आत्करगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स.नं-231 मधील जागेत एसएमएस कंपनी जैववैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी खरेदी करीत आहेत. यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला घेतला होता. या जागेपासून 200 मी अंतरावर गाव नदी तसेच 500 मी. अंतरावर पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, आत्करगांव वाडी, बौध्दवाडा, जंगमवाडी जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचर्यामुळे हवा दुषित होऊन दुर्गधी पसरेल तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होऊन नदीवरील पाणी योजना दुषित होत साथीचे आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकता, अशी भीती निर्माण झाली आहे.
13 ऑगस्ट रोजीची जनसुनावणी रद्द करण्यात आली आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला, परंतु पुन्हा 17 नोव्हेंबर जनसुनावणी घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर न्यायदंडाधिकारी डॉ. पद्श्री बैनाडे, प्रादेशिक आधिकारी किल्लेदार, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी उपस्थित होते. या वेळी खालापूर तालुक्यात अनेक रासायनिक, पोलाद उत्पादन करणार्या कारखान्याच्या प्रदुषणामुळे ग्रामस्थ त्रस्त असतानाच अजून जैविक कारखाने आणून आमचा जीव घेता का? असा सवाल देवन्हावेचे सरपंच अंकीत साखरे यांनी करीत जैविक कारखाना येऊ यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जि. प. सदस्य यांच्या माध्यमातून विरोध करू तसेच शासनाने आमचे बाजू ऐकली नाही तर एक्स्प्रेस वे जाम करू, असा इशारा अंकीत साखरे यांनी दिला आहे.