अलिबाग : प्रतिनिधी
रायगड पोलीस दलात भरती झालेल्या महिला उमेदवारांकडून खंडणी मागणार्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील लिपिकास अटक करण्यात आली आहे. प्रदीप ढोबाळ असे या लाचखोर लिपिकाचे नावे असून सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने महिला उमेदवारांकडे खंडणी मागितली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी (दि. 16) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रायगड पोलीस दलात 272 शिपाई व सहा चालकपदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात आली. यात 81 महिला उमेदवार आहेत. सर्व उमेदवारांनी मैदानी चाचणी, शारीरिक क्षमतेचा अडथळा पार केला. प्रमाणत्रांची छाननी झाली. हे उमेदवार लेखी परीक्षादेखील उत्तीर्ण झाले. या सर्व उमेदवारांना रूजू होण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून तंदुरूस्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे क्रमप्राप्त होते. ते मिळविण्यासाठी उमेदवार अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले. सर्व तपासण्या करण्यात आल्या, परंतु जर कोविड प्रतिबंधक लसीची तिसरी मात्र घेतलेली नसल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र देणार नाही. लसीची तिसरी मात्रा घेतलेली नसतानादेखील वैद्यकीय प्रमाणपत्र हवे असल्यास प्रत्येकी 1500 रुपये द्यावे लागतील, असा निरोप जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील लिपिक प्रदीप ढोबाळ यांनी पोलीस रुग्णालयातील वॉर्डबॉयकडे दिला. त्यानुसार 14 महिला उमेदवारांनी प्रत्येकी 1500 रुपये व एका उमेदवाराने 500 रुपये दिले. एकूण 21 हजार 500 रुपये ढोबाळ यांना देण्यात आले.
याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यानुसार प्रथम पोलीस रुग्णालयातील वॉर्डबॉयला बोलावून त्याच्याकडून माहिती घेण्यात आली. त्याने प्रदीप ढोबाळ यांना पैसे दिल्याचे सांगितले तसेच महिला उमेदवारांनीदेखील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील लिपिकास पैसे दिल्याचे सांगितले.
पोलीस रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील लिपिक प्रदीप ढोबाळ यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय जाधव पुढील तपास करीत आहेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग उपविभीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे अन्वषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे हेही उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …