Breaking News

सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिका देशात दुसरी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिकेला देशात द्वितीय क्रमांकाचे मानांकन जाहीर झाले आहे. वॉटर प्लस मानांकनानंतर आणखी एक मानाचा तुरा नवी मुंबईच्या शिरपेचात खोवला गेला आहे. मॅनहोल ते मशीनहोल अर्थात सिवेज लाईन व सेफ्टिक टँकची धोकादायक पद्धतीने माणसांकडून होणारी सफाई पूर्णपणे थांबवून त्या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान जाहीर करण्यात आले होते. मानवी पद्धतीने सफाईची कार्यवाही टाळून 2005 पासूनच यांत्रिकी पद्धतीने सफाईची कार्यवाही करणारी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानात आत्मविश्वासाने सहभागी झाली. पालिका क्षेत्रातील नोडल भागात 100 टक्के मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे असून 656 सफाई मित्रांच्या माध्यमातून मलनिस्सारण वाहिन्या, सेफ्टिक टँक यांची यांत्रिकी पद्धतीने नियमित स्वच्छता करण्यात येते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सफाईसाठी चेंबरमध्ये उतरून कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या सफाई मित्रांना गणवेश, हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, फूल बॉडी वेदर सूट अशी आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आलेली आहेत. तसेच मलनिस्सारण वाहिन्यांच्या अंतर्गत भागातील दूरपर्यंतची सफाई करण्याच्या दृष्टीने जेटिंग मशीनच्या जेटिंग पाईपला सिव्हर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. अभियानाच्या अनुषंगाने देशभरात आयोजित केल्या जाणार्‍या राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळांचा शुभारंभ नवी मुंबई महापालिकेत झाला. एमएमआर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली व भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांच्या अधिकारी, कर्मचारी वृंदासाठी सफाई मित्र चॅलेंजविषयक माहितीपूर्ण कार्यशाळा नवी मुंबई महापालिकेने आयोजित केली. स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या सहकार्याने सफाई मित्रांसाठी लोन मेळा आयोजित करण्यात आला. अशा प्रकारे सफाई मित्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार्‍या कर्ज योजनेचा लाभ देणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply