पेण : प्रतिनिधी
समुद्रात सतत निर्माण होणार्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेले दोन महिने अवकाळी पावसाने संपुर्ण राज्याला वेठीस धरून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 17 नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे पेण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कापलेली भातशेती भिजून गेली आहे. चार्यासाठी लागणारी वैरण (पेंढा) भिजल्यामुळे दुर्गंधी सुटून गुरांना खाण्यास अयोग्य ठरली आहे. अवकाळी पावसामुळे भातपिकाची वैरण पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पेण तालुक्यातील बेलवडे, तरणखोप, मुंगोशी, शेणे, धामणी, आंबेघर, सावरसई, सापोली, हेमडी, मांगरूळ, कामार्ली, मळेघर, बोरगाव, रोडे- कश्मिरे या गावांमध्ये पशुपालकांची संख्या मोठी आहे. येथून पेण शहराला दररोज मोठ्या प्रमाणात दुध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा होत असतो. यंदाचा खरीप हंगामात भाताचे चांगले उत्पन्न आले होते. त्यामुळे गुरांचा वैरणीचा प्रश्न उद्भवत नव्हता. परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसून भातशेतीचे नुकसान झाले. अवकाळी पडणार्या पावसाने धान्य आणि पेंढा अशा दोन्ही प्रकारे शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे. गुरांसाठी लागणारी वैरण अवकाळी पावसात भिजल्याने आता वापरायोग्य राहिली नाही. त्यामुळे गुरांच्या वैरणी अभावी पशुधन पालकांची मोठी गैरसोय होणार असून वैरणीची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवणार आहे.