माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कविळवहाळ बुद्रुक येथील एकच जमीन दोन वेळा विकल्यानंतर त्या जमिनीचा तिसर्यांदा साठेकरार करून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधू बाबू बागवे व संजय साधू बागवे यांनी त्यांच्या मालकीची कविळवहाळ बुदु्रक येथील मिळकत (गट नंबर 573 क्षेत्र 0-36-0 व गट नंबर 574 क्षेत्र 0-07-0) 7 सप्टेंबर 1994 रोजी रजिस्टर साठेकरारनामा करून ओमप्रकाश रामचंद्र जोगानी (रा. मालाड मुंबई) यांना विकली होती. त्यानंतर तीच मिळकत दुसर्यांदा चंद्रशेखर रामचंद्र साकोळीकर (रा. माणगाव) यांना विकली. त्याचा रजिस्टर साठेकरारनामा 15 एप्रिल 2010 रोजी करण्यात आला होता. तरीही हीच जमीन प्रतिभा गणेश जाधव (रा. उतेखोलगाव, ता. माणगाव) यांना विकल्याचा रजिस्टर साठेकरारनामा 17 डिसेंबर 2012 रोजी करून साधू बागवे व संजय बागवे यांनी त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले. या प्रकरणी प्रतिभा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 34सह नोंदणी अधिनियम 1908चे कलम 82नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे करीत आहेत.