मत्य खवय्यांची चंगळ; पर्यटकांनाही मेजवानी
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील बाजारात नियमित ताजी मासळी उपलब्ध होत आहे. ती खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडत आहेत. समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे. परिणामी मासळीचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी उतरले आहेत. 800 ते 1000 रुपये किलोने मिळणारे पापलेट, सुरमई व रावस आता जेमतेम 600 ते 700 रुपये किलोने मिळत आहेत. शिवाय विविध जाती व प्रकारचे मासे मिळत असल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात येणार्या पर्यटकांनादेखील स्वस्तात चांगली मासळी मिळत आहे.
ओले बोंबील, मांदेली, कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने त्यांचे भावदेखील खूप उतरले आहेत. चांगली आवक होत असल्याने मासळीचे भाव उतरले आहेत. सध्या माशांची स्वस्ताई असल्याने खवय्ये व पर्यटक मोठ्या प्रमाणात मासळी खाण्याचा आंनद घेत आहेत. सुरमई, रावस, टोळ, कर्ली, घोळ व पापलेट हे अधिक मागणी असलेले महागातले मासे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत.
मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू झाल्याने माशांची आवक वाढली आहे. मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात मासळीचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे खवय्ये खूप खुश आहेत.
-गौरी मनोरे, मासळी विक्रेत्या, पाली, ता. सुधागड
सध्या ताजी मासळी मोठ्या प्रमाणात व स्वस्तात मिळत आहे. त्यामुळे मासे खरेदीवर अधिक भर आहे.
-गिरीश काटकर, ग्राहक, पाली, ता. सुधागड