Breaking News

ओबीसी जागर अभियान रथयात्रेचा रायगडात शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याचा निषेध करून या सरकारच्या झारीतील शुक्राचार्याची भूमिका उघड करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला जागृत करण्याकरिता भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील ओबीसी जागर यात्रेला सुरुवात झालीय.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ठाकरे सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. सरकारने केवळ तात्पुरता अध्यादेश काढून ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. न्यायालयात टिकेल आणि ज्याला संविधानात्मक संरक्षण असेल असे आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येऊन सरकारला असे आरक्षण द्यायला भाग पाडावे लागणार आहे, कारण हे सरकार ओबीसी समाजाबाबत उदासीन आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे राज्य मागास आयोगाची या सरकारने दुर्दशा केली आहे. ओबीसी समाज हा आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी एकत्र येऊन संघर्ष करीत नाहीये. त्याचाच गैरफायदा हे सरकार घेत आहे. ओबीसी समजाला गृहीत धरले जात आहे. या वेळी जर ओबीसी समाज एकत्र आला नाही तर ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि सामाजिक अस्तित्वदेखील धोक्यात येईल. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र यावे यासाठी हे अभियान राबवले जात आहे.
ओबीसी जागर अभियानाचे उत्तर रायगडमधील उद्घाटन ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे भाजप कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी करण्यात आले. या वेळी ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका सीता पाटील, भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, भटक्या विमुक्त आघाडी महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सामाजिक कार्यकर्ते आर. जी. म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, मंडल सरचिटणीस शरद जगताप, आध्यत्मिक आघाडी संयोजक विनोद खेडकर, मनीषा वनगे, जयश्री आचार्य, मनीषा पाटील, वनिता पाटील या पदाधिकार्‍यांसह अनेक भाजप ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे आज राजकीय आरक्षण गेले. उद्या शिक्षण आणि नोकरीचे आरक्षणही काढतील. या पार्श्वभूमीवर समाजात या संदर्भात जागर झाला पाहिजे आणि जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, अशी भूमिका या जागर यात्रेची आहे.

पनवेलमध्ये आजपासून तीन दिवस जागर
पनवेल ः ओबीसी जागर अभियानांतर्गत भाजप उत्तर रायगड ओबीसी मोर्चातर्फे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जनजागर रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये तीन दिवस ओबीसी आरक्षणासंदर्भात जागर होणार आहे.
या रथयात्रेला रविवारी (दि. 21) सकाळी 10.30 वाजता पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरुवात होणार आहे. पुढे मार्गक्रमण करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, खांदा कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन पनवेल शिवा कॉम्प्लेक्स, रेल्वेस्थानकाजवळील बिकानेर कॉर्नर; सोमवारी (दि. 22) सकाळी 10.30 वाजता सुकापूर ग्रामपंचायत, त्यानंतर नेरे नाका, लोणीवली, बेलवली, शेडुंग नाका, तर मंगळवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता चिंध्रण, पुढे महालुंगी, मोर्बे, खानाव, वाकडी, शांतीवन फाटा आणि शेवटी आकुर्ली स्टॉप येथे रथयात्रा होऊन ओबीसीसंदर्भात जागर करण्यात येणार आहे.
या यात्रेत कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी मोर्चा महिला जिल्हा संयोजक सीता पाटील, पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, तालुका अध्यक्ष विनेश भागीत, शहर महिला संयोजिका वृषाली वाघमारे यांनी केले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply