उरण : वार्ताहर
आखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर (नाशिक) बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग यांच्या वतीने उरण शहरात श्री स्वामी समर्थ केंद्र आनंद नगर येथे रविवारी (दि. 21) सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकदिवसीय बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उरण शहरातील एन. आय. हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, यू. ई. एस. हायस्कूल, रोटरी स्कूल आदी शाळांमधून 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. या बालसंस्कार वर्गात 4 ते 15 वर्षे वायोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शिबिराची सुरुवात स्वामींच्या भूपाळीने करण्यात आली. शिबिरात मुलांना मेडिटेशनचे फायदे व ते कसे करावे हे शिकवण्यात आले. स्तोत्र, मंत्र पठण, तसेच खेळ घेण्यात आले. याचबरोबर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व बौद्धिक मापन टेस्ट घेण्यात आली. पूर्ण एक दिवस मुलांनी मोबाइलशिवाय घालवला व नवीन गोष्टी आत्मसात केल्या. शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट देऊन व स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र प्रतिनिधी व पालकवर्ग यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. संपूर्ण शिबिराचे नियोजन बालसंस्कार प्रतिनिधी, केंद्र प्रतिनिधी व कार्यरत सेवेकरी वर्गाने केले. उरण आनंदनगर येथील श्रीस्वामी समर्थ केंद्रात दर शनिवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत बालसंस्कार वर्ग घेण्यात येतात, असे केंद्र प्रतिनिधीने सांगितले.