Breaking News

पनवेल मनपा हद्दीतील रस्ते नूतनीकरण व दुरूस्तीसाठी मान्यता

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील रस्ते नूतनीकरण व दुरूस्तीच्या कामासाठी प्रशासकीय खर्चास सोमवारी (दि. 6) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता पनवेलमधील रस्ते चांगले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचबरोबर प्रभाग ’क’मधील लेंडाळे तलावही आता सुशोभीत होणार आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर, सदस्य प्रकाश बिनेदार, निलेश बावीस्कर व समितीचे इतर सदस्य, उपायुक्त विठ्ठल डाके व अन्य अधिकारीवर्ग उपस्थित होता. बैठकीच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी पनवेल महापालिका हद्दीतील निरनिराळ्या जागी रस्ते दुरुस्ती, नूतनीकरण, सुधारणा वार्षिक तत्त्वावर करण्याच्या कामाला व कामाकरिता वाढीव खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली. प्रभाग ’क’मधील लेंडाळे तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. शिक्षण विभागातील मुदतपूर्ती झालेल्या मुदत ठेवींचे नूतनीकरणासही मान्यता देण्यात आली. विविध ठिकाणी गटार बांधकाम करण्यास व दुरुस्तीच्या कामासाठी वाढीव खर्चासदेखील स्थायी समितीने मान्यता दिली.
या बैठकीत महापालिकेला वाहन पुरविणार्‍या जे. के. टुरिस्ट अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेल्या रकमेबाबत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी शंका उपस्थित केल्याने तो विषय स्थगित करण्यात आला. एलईडी पथदिवे पुरवठा करण्याबाबत तांत्रिक माहिती उपलब्ध करून न दिल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हा विषय स्थगित करण्याची मागणी केली. ती सभापतींनी मान्य केली. मे. गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर यांची कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी पुरवण्याच्या कंत्राटाची मदत संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली नाही.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply