पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत शनिवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले.
प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे मार्गदर्शन केंद्र सुरू असणार आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकार्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे हे केंद्र सुरू होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनाही या मार्गदर्शन केंद्राचा लाभ मिळणार आहे, तसेच कोविड 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पेण येथील केंद्रावर हजर राहणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणार्या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तहसीलदार विजय तळेकर यांच्या सूचनेनुसार या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले. या शिबिरात जवळपास 40 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. याशिवाय या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्यातून अधिक प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्येदेखील अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असा मानस जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची आणि विशेषतः राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करणार्या पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय पनेवल येथे अर्ज सादर करून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या वतीने पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी केले आहे.