मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील माझेरी रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत यामधून येत आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात, मात्र या रस्ताची अवस्था बिकट बनली आहे. या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास या खात्यातील अधिकार्यांना वेळ मिळत नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रवासी वर्गातून उमटत आहे.
सध्या तरी या खड्ड्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाणूनबुजून कानाडोळा व सुस्तीपणा दाखवत आहेत का? हा प्रश्न साधारण व्यक्तीसह चालकांना पडला आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याच खड्ड्यातून नुकतीच अॅटोरिक्षा पलटी होऊन प्रवासी किरकोळ जखमी झाले. या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता मुस्लिम मोहल्ल्यातील अनेक वेळा बांधकाम विभागाकडे तक्रार व विनंती करूनसुद्धा या ठिकाणचे खड्डे बुजविले जात नसल्याने माझेरी मुस्लिम समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे.
रस्ते चांगल्या दर्जाचे बनविले जात नसल्याने या ठिकाणी पर्यटकांची संख्याही कमी होत आहे. यामुळे येथील व्यवसायावर परिणाम होत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांनी या रस्त्याकडे तातडीने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून नव्याने चांगल्या दर्जाचा रस्ता बनवावा, अशी मागणी माझेरी मुस्लिम समाजाच्या वतीने केली जात आहे. या संदर्भात मुरूड बांधकाम खात्यातील अधिकारी माने यांना विचारणा केली असता हा रस्ता जिल्हा परिषदेकडे असल्याने याची माहिती आम्ही देऊ शकत नाही, अशी उत्तरे देण्यात आली.