पनवेल : वार्ताहर
म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याची माहिती रात्री उशिरा दिली. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करीत प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याची एकही संधी राज्यातील हे करंट सरकार सोडताना दिसत नाही, असा आरोप विक्रांत पाटील यांनी केला आहे.
विक्रांत पाटील पुढे म्हणाले, हे सरकार उत्कृष्ट कामगिरी करत असेल तर फक्त खंडणी आणि दलाली वसुली मध्ये, बाकी विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नात अपयशी ठरलेले हे सरकार आहे. रविवारी (दि. 12) होणार्या म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री रात्री दोन वाजता केवळ एका व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून देतात हे मोठे दुर्दैव आहे.
आरोग्य सेवक भरती परीक्षेतही चार वेळा असे प्रकार झाले, आता म्हाडाच्या परीक्षामध्ये सुद्धा तोच प्रकार! हे सरकार जनसामान्यांचे नाही, तर दलालांचे सरकार आहे या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. या सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांची असताना खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी सरकार हे रॅकेट चालवत असल्याचे दिसते.