Breaking News

सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

वुहान (चीन) : वृत्तसंस्था

पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि समीर यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत चौथ्या मानांकित सिंधूने 33 मिनिटे रंगलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या चोयरून्निसाचा 21-15, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली सिंधूची उपांत्य लढत चीनच्या बिगरमानांकित काय यानयानशी होणार आहे.

सातव्या मानांकित सायनाने 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम गा ईऊनचा 21-13, 21-13 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेली सायना उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावरील अकानी यामागुचीशी भिडणार आहे.

पुरुष एकेरीत समीरने हाँगकाँगच्या लाँग अँगसचे आव्हान 21-12, 21-19 असे मोडीत काढले. पुढील फेरीत त्याच्यासमोर चीनच्या द्वितीय मानांकित शि युकीचे आव्हान असेल.

मिश्र दुहेरीत उत्कर्ष अरोरा आणि करिष्मा वाडकर यांचे दुसर्‍या फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे. इंडोनेशियाच्या हाफिझ फैझल आणि ग्लोरिया ईमानुइल्ले विडजाजा जोडीने उत्कर्ष-करिष्माला 21-10, 21-15 असे नामोहरम केले. याचप्रमाणे चीनच्या वांग यिलयू आणि ह्युआंग डाँगपिंग जोडीने वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगण जोडीचा 21-10, 21-9 असा पराभव केला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply