Breaking News

पनवेल परिसरात पोलिसांची ऑल आऊट मोहीम

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका व शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत वेगवेगळी आस्थापने व उद्योगधंदे, हॉटेल, लॉज आदींच्या विरोधात एकाच वेळी ऑल आऊट मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने अनैतिक धंदे करणार्‍यांचे, तसेच शासनाचे नियम न पाळता व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर  आणि  पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने कोन नाका परिसर व खारपाडा टोलनाका येथून ये-जा करणार्‍या 132 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातील वेगवेगळे लॉजेस, बार, हॉटेल यांचीही तपासणी करण्यात आली, तसेच अवैध दारुविक्री करणे, त्याची वाहतूक करणे, जवळ बाळगणे अशा प्रकारे तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उरण नाका, टपाल नाका, पंचरत्न, शिवशंभो नाका परिसर, ठाणे नाका आदी विभागांतून ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यात आली. तर गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास व जवळ बाळगण्यास बंदी असतानाही सदर नियम तोडणार्‍या दोघांवर या पथकाने कारवाई केली. त्याचप्रमाणे अभिलेखावरील चार आऱोपींची तपासणी करण्यात आली आहे. 14 जणांवर समन्स बजावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अवैधरीत्या मद्यविक्री, मटका जुगार चालवणार्‍या तिघांविरुद्ध कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयितरीत्या घुटमळणार्‍या दोघांविरुद्धसुद्धा या ऑपरेशनमध्ये कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर येणार्‍या-जाणार्‍या पादचारी लोकांना विभत्स चाळे व हातवारे करणार्‍या महिलांविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात आली. पनवेल शहर व तालुका पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply