Breaking News

भारताकडून यजमान बांगलादेशचा धुव्वा

चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आघाडीपटू दिलप्रीत सिंगने साकारलेल्या हॅट्ट्रिकमुळे गतविजेत्या भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत बुधवारी दुसर्‍या साखळी सामन्यामध्ये यजमान बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला.

सलामीच्या लढतीत कोरियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्यानंतर भारताने बांगलादेशविरुद्ध आक्रमक शैलीत खेळ केला. दिलप्रीतने (12, 22 आणि 45वे मिनिट) पूर्वार्धात दोन, तर उत्तरार्धात एका गोलची नोंद करत हॅट्ट्रिक साकारली. जर्मनप्रीत सिंगने (33 आणि 43वे मि.) पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल करत त्याला तोलामोलाची साथ दिली. भारताचे उर्वरित गोल ललित उपाध्याय (28वे मि.), आकाशदीप सिंग (54वे मि.), पदार्पणवीर मनदीप मोर (55वे मि.) आणि उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (57वे मि.) यांनी केले.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारताने पहिल्या दोन सत्रांत बहुतांश वेळ चेंडूवर ताबा मिळवला, तर बांगलादेशने बचावात्मक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भारताचे आक्रमण रोखण्यात अपयश आले. गोलरक्षक अबू निपॉनचा चमकदार खेळही बांगलादेशचा मोठा पराभव टाळू शकला नाही. भारताने या विजयासह जेतेपदासाठी दावेदारी पेश केली असून शुक्रवारी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पुढील साखळी सामना होणार आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply