पनवेल : रामप्रहर वृत्त
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या सोमवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. भगिरथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही स्वतःची शैक्षणिक संस्था असली तरी त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर जीवापाड प्रेम आहे. रयत संस्थेला मातृसंस्था मानून ते कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीला धावून आले. ‘रयत’च्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे हे सर्वश्रुत आहे.
चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर असतात. याच सुनीतीतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. रयत आणि ठाकूर कुटुंबीय यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयतसेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सदैव करीत असतात.
रयत शिक्षण संस्थेच्या विकासात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना कमवा आणि शिका या योजनेत त्यांना मिळाले होते. त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. ‘रयत’च्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे भव्य भवन उभारण्यात आले आहे. या सोहळ्यास रयतप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …