पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे खारघर येथील रिसर्च सेंटर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सुरू झाले आहे. हे सेंटर सुनियोजित पद्धतीने तसेच 100 टक्के क्षमतेने सुरू व्हावे याकरिता ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व एम. बी. शेख, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि ओएसडी शहाजी डोंगरे यांनी बुधवारी (दि. 22) पाहणी करून आढावा घेतला.
खारघर येथील ‘रयत’च्या रिसर्च सेंटरमध्ये पुण्यातील विज्ञान तंत्रज्ञान केंद्र आणि टाटा टेक्नॉलॉजी लि.च्या सहयोगातून विविध सुविधा पुरविल्या जातात. या सेंटरच्या माध्यमातून पहिल्या पिढीतील तरुण उद्योजक घडावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये इनक्युबेशन सर्व्हिससाठी विज्ञान तंत्रज्ञान केंद्रामार्फत, तर टाटा टेक्नॉलॉजी लि.च्यावतीने कौशल्य विकासासंदर्भात प्रशिक्षण देऊन स्टार्टअपबाबतचे सर्व स्वरूपाचे मार्गदर्शन केले जाते. या सेंटरमार्फत उद्योजकता आणि स्टार्टअप या विषयांना अनुसरून अनेक महाविद्यालयांत कार्यशाळा व शिबिरे घेतली जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता सहकार्य होते.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या काळानंतर खारघरमधील रिसर्च सेंटर पुन्हा सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी या सेंटरची पाहणी करून ते सुनियोजित पद्धतीने सुरू होऊन जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून आणखी सुविधा कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकतात या संदर्भात आढावा घेतला. या वेळी सेंटरचे समन्वयक गणेश कदम व इतर उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …