Breaking News

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून काम संथगतीने होत असल्याने चालक आणि प्रवासी यांना नाहक त्रास आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करीत या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू असल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच या महामार्गावर होत असलेल्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे लाखो लिटर इंधन वाया जात असून नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात शारिरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. महामार्गाच्या दहा टप्प्यांचे काम करणार्‍या 11पैकी मोजके कंत्राटदार वगळता अन्य कंत्राटदारांनी 60 टक्क्यांपर्यंतही काम केलेले नाही. या महामार्गाचे काम तातडीने पूर्णत्त्वास नेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे, असा सवाल तारांकित प्रश्नाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शासनाला केला.

या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66च्या पनवेल ते इंदापूर (किमी ते किमी 84) या लांबीतील चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीत येत असून त्यांच्यामार्फत प्रगतिपथावर आहे. या लांबीतील चौपदरीकरणाचे खाजगीकरणांतर्गत बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर हाती घेण्यात आलेले काम संथगतीने सुरू आहे. तथापि उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दृष्टिने आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

महामार्ग प्राधीकरणाकडून तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होऊ नयेत या दृष्टीने वाहतूकसदृश स्थितीत राखण्यासाठी कंत्राटदाराच्या खर्चाने व जबाबदारीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण, पनवेल यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 रस्त्याच्या इंदापूर ते झाराप (किमी 84/00 ते किमी 450/170) या एकूण 355.285 किमी लांबीतील चौपदरीकरणाचे काम राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांच्यामार्फत (एनएच, पीडब्ल्यूडी) हाती घेण्यात आले आहे. या लांबीपैकी एकूण 210.580 किमी लांबीतील काम पूर्ण झाले असून उर्वरित 144 किमी लांबीतील महामार्गाचे काम प्रगतीत आहे. तथापि, प्रगतीपथावरील लांबीपैकी इंदापूर ते वडपाले व परशुराम घाट ते वाकेडमधील 117.36 किमी लांबीचे काम संथगतीने सुरू आहे, परंतु हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विविध स्तरांवर वेळोवेळी आढावा बैठका घेण्यात येऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे तसेच प्रगतिपथावरील काम करताना वाहतूक कोंडी व अपघात होऊ नयेत या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून काम करण्यात येत असून सद्यस्थितीत महामार्ग सुस्थितीत आहे.

सद्यस्थितीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचएआय) प्रगतीपथावरील चौपदरीकरणाचे काम सुमारे 88 टक्के पूर्ण झाले असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण, पनवेल यांनी कळविले आहे तसेच राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांचेमार्फत (एनएच, पीडब्ल्यू) हाती घेण्यात आलेले इंदापूर ते झाराप या लांबीतील 10 टप्प्यांतील कामांमधील टप्पा क्र.4 (कशेडी ते परशुराम घाट), टप्पा क्र. 8 वाटूळ ते तळगाव), टप्पा क्र. 9 (तळगाव ते कळमठ) व टप्पा क्र. 10 (कळमठ ते झाराप) अशा चार टप्प्यांतील काम जवळपास पूर्ण झाले आहे व टप्पा क्र. 2 (वडपाले ते भोगाव खुर्द), टप्पा क्र. (भोगाव खुर्द ते कशेडी) या दोन टप्प्यांमधील काम सुमारे 70 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित चार टप्प्यांमधील (इंदापूर ते वडपाले व परशुराम घाट ते वाकेड) काम प्रगतीत आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणामार्फत प्रगतिपथावर असलेल्या कामाकरिता सवलत करारनाम्यानुसार मूळ सवलत करार समाप्त करण्याचे आदेश 17 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरित कामासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू असून हे काम जून 2022पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण, पनवेल यांनी कळविले आहे तसेच राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांच्यामार्फत (एनएच, पीडब्ल्यूडी) हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी टप्पा क्र. 1 (इंदापूर ते वडपाले) व टप्पा क्र. 5, परशुराम घाट ते आरवली या कामांची प्रगती लक्षात घेऊन देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार हे काम जून 2022पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे व टप्पा क्र. 6 आरवली ते कांटे व टप्पा क्र. 7 कांटे ते वाकेडमध्ये उर्वरीत कामांकरीता पर्यायी कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून त्यानुसार ही कामे डिसेंबर 2022पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply