Breaking News

विवेक पाटलांचा लढाईआधीच पराभव

महेश बालदी यांचा उमेदवारी अर्ज वैध

उरण : वार्ताहर

बुडित जाणार्‍या कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा दुरूपयोग करून शेकापचे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विवेक पाटील यांच्याकडून जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या उमेदवारी अर्जास हरकत घेण्यात आली होती, मात्र पाटील यांचा आक्षेप फेटाळत लावून बालदी यांचा अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले. त्यामुळे विवेक पाटलांना जोरदार चपराक बसली आहे.

कर्नाळा बँकेतील खातेधारक श्री. चौधरी यांनी महेश बालदी यांना 24 लाख रुपयांचा धनादेश दिला होता. त्यांच्या खात्यात पुरेसे पैसे असूनसुद्धा कर्नाळा बँक नादारीच्या अवस्थेत पोहोचल्यामुळे हा धनादेश बँक वटवू शकली नाही आणि त्याकरिता महेश बालदी यांनी श्री. चौधरी यांना निगोशियेबल इन्स्ट्रूमेंट कायद्याचे कलम 138 नुसार नोटीस दिली होती. त्यामुळे श्री. चौधरी यांनी कर्नाळा बँकेस नोटीस पाठवून जाब विचारला आणि धनादेश न वटविल्याबद्दल जबाबदार धरले, तसेच आलेली 138ची नोटीस बँकेला माहितीसाठी पाठविली. या नोटीसच्या प्रतीचा गैरफायदा घेत येणे असलेली रक्कम बालदी यांनी नामनिर्देशनपत्रात बाकी म्हणून दाखविली नाही, असा आक्षेप विवेक पाटील यांनी घेतला.

बालदी यांनी या आक्षेपाचे खंडन करताना निदर्शनास आणले की, ही नोटीस 16 सप्टेंबर 2019 रोजी दिली व नामनिर्देशनपत्र 1 ऑक्टोबर रोजी दाखल केले. ज्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल केले तेव्हा कोणतीही रक्कम येणे बाकी नसल्याने या रकान्यात निरंक म्हटले आहे. हे म्हणणे मान्य करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विवेक पाटलांची हरकत फेटाळली आणि निवडणुकीच्या पहिल्याच पायरीवर पाटलांना पराभव पत्करावा लागला. या वेळी महेश बालदी यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीकांत गावंड, अ‍ॅड. सुयोग बारटक्के व अ‍ॅड. विनायक कोळी यांनी काम पाहिले.

दरम्यान, कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा अशा रीतीने दुरूपयोग केल्याबद्दल शेकाप उमेदवार विवेक पाटलांची जनमानसात मोठ्या प्रमाणात निंदा होत आहे. त्याचप्रमाणे आमचे पैसे कधी मिळणार, असा संतप्त सवाल ठेवीदार विवेक पाटलांना करीत आहेत.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply