उरण : रामप्रहर वृत्त
इंडियन पोर्ट असोसिएशनच्या व्यवस्थापनाने सहा महासंघांची बैठक बुधवारी (दि. 22) नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. बीडब्लूएनसीच्या 10 डिसेंबरला झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीला भारतीय पोर्ट तसेच डाक मजदूर महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर उपरकर, जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील. इंडियन पोर्ट असोसिएशन व्यवस्थापनाचे चेअरमन विनीत कुमार, अॅडव्हायजहर आर. डी. त्रिपाठी, एमडी अरविंद चौडे उपस्थित होते. या बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या वतीने विविध विषयावर अध्यक्ष प्रभाकर उपरकर, सुरेश पाटील यांनी आपली बाजू इंडियन पोर्ट असोसिएशनच्या अधिकार्यांसमोर मांडली.
या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. एमपए अॅक्ट 2021नुसार भारतातील सर्व बंदरात कामगार विश्वस्त हा विद्यमान कामगारच असला पाहिजे. तो निवृत्त कामगार किंवा बाहेरचा नसावा. भारतातील सर्व बंदरात निवडणूक प्रक्रिया ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे. सर्वांचे विचार ऐकल्यानंतर पोर्टनुसार 55%- 45% उत्पादकता गुणोत्तर सध्याच्या 2021साठी बोनस देण्याचे व्यवस्थापनाने चर्चेत मान्य केले. बीडब्लूएनसीच्या निवडीच्या प्रक्रियेस विलंब होत आहे या विषयावर बीडब्लूएनसीची लवकरच बैठक घेऊन शिपिंग मंत्रालयाशी लवकरच संपर्क साधला जाणार असल्याचे सांगितले. भत्ते गोठविण्यासंदर्भात व्यवस्थापनाने मंत्रालयाशी चर्चा करून सौदार्हपूर्ण तोडगा काढण्याचे, तसेच सीसीएस पेन्शन रुल 1972 नुसार पेन्शन नियमन आणि शिफारशीबाबत बंदरे, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव यांच्याशी बैठक लावून देण्याचे मान्य करण्यात आले.
मुंबई बंदर, गोवा बंदर अध्यक्षांशी चर्चा करून विलंब न करता मुंबई गोवा पोर्ट ट्रस्ट कामगार आणि पेन्शन धारकांना मागील थकबाकी, पेन्शन देण्यासाठी योग्य ती कारवाई करू, असे आश्वासनही व्यवस्थापन कमिटीने दिले आहे. जेएनपीटी बंदरातून सुरेश पाटील हे एकमेव कामगार नेते व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. भारतीय बंदरातील विविध समस्या सोडविण्यासाठी सुरेश पाटील हे विशेष प्रयत्न करीत आहेत.