Breaking News

पेण भूमीअभिलेख कार्यालयाला रिक्तपदांचे ग्रहण

कामकाज थंडावले; जनता मात्र हैराण

पेण : प्रतिनिधी

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्तपदांमुळे सर्वसामान्य जनतेची या कार्यालयाशी निगडीत असलेली बरीच कामे खोळंबली आहेत. अनेक फेर्‍या मारूनसुद्धा काम होत नसल्याने नागरिकांमध्ये या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या कार्यालयातील रिक्तपदे वेळीच भरली नाही, आणि थंडावलेले कामकाज असेच राहिले तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

पेण भूमिअभिलेख कार्यालयातील 21 मंजूर पदापैकी वर्ग तीनमधील मुख्य सहाय्यक आणि इतर सहा पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे जाणवते. सद्यस्थितीत कार्यालयामध्ये वर्ग तीनमधील एस. आर. गणतांडेल, एस. पी. सहा, एस. एस. शिंदे, भू मापक अपर्णा देशपांडे, एस. एस. कुंभार, एन. आर. वाघमारे, एस. जी. तळेकर, सोनाली कुटे या कार्यालयीन कर्मचार्‍याकडे अनेक टेबलाचा कार्यभार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. जमीन मोजणीसाठी येणार्‍या नागरिकांच्या अर्जाच्या संबंधित जमिनीची मोजमापे घेण्यासाठी साइटवर व्हिजीट देणे, मोजणी करणे, आलेल्या अर्जानुसार नागरिकांना माहिती व नकाशाच्या नकला देणे इत्यादी कामे या कर्मचार्‍यांना करावी लागतात. मात्र कर्मचारी कमी असल्याने काही प्रकरणाबाबत ते नागरिकांना न्याय देऊ शकत नाहीत. रिक्त पदापैकी वर्ग तीनमधील सात पदांच्या कामाचा भार कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्‍यांवर पडत आहे. स्वत:च्या टेबलाबरोबरच रिक्तपदाच्या टेबलाची अतिरिक्त कामे या कर्मचार्‍यांना करावी लागत आहेत. कार्यालय प्रमुख उपभूमिअधीक्षक गणेश राठोड या कार्यालयात आठवड्यातून कोणत्या दिवशी येतात, याबाबत नागरिकांना माहिती नसते. पेण भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे नागरिकांची कामे वेळच्यावेळी होत नाहीत, त्यांना एका कामासाठी या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे नागरिक आणि येथील कर्मचार्‍यांचे अनेकदा खटकेही उडताना दिसतात.  पेण भूमिअभिलेख कार्यालयाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण कधी सुटणार आणि कार्यालयीन कामकाजाची गाडी कधी रूळावर येणार याची नागरिकांना प्रतिक्षा आहे. जिल्हा भूमिअभिलेख  कार्यालयाच्या जिल्हा अधीक्षक चव्हाण मॅडम यांनी वेळीच दखल घेऊन, रिक्तपदावर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करुन पेण भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज प्रगतीपथावर आणावे, अशी भावना पेणमधील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply