मुंबई ः प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. ही निवडणूक कधी होणार? कशी होणार? राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार? अशा अनेक मुद्द्यांवरून तर्क-वितर्क सुरू होते, मात्र अखेर याबाबतचा निर्णय झाला असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. 28) राज्यपालांनी राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर दिले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यंदाच्या अधिवेशनातच गुप्त मतदान पद्धतीने न घेता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी 28 डिसेंबर अर्थात मंगळवारचा दिवस नक्की करण्यात आला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून प्रस्तावदेखील राज्य सरकारने सोमवारी राज्यपालांना पाठवला होता, मात्र राज्यपालांची मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे नेमकी निवडणूक होणार की नाही या विषयी चर्चा सुरू झाली होती. राज्य सरकारला राज्यपालांच्या उत्तराची प्रतीक्षा असताना अखेर दुपारी राज्यपालांनी पत्राद्वारे राज्य सरकारला उत्तर पाठवले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश केला याविषयी माहिती समोर आलेली नसली, तरी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात राज्यपालांनी या निवडणुकीसाठी आवाजी मतदान पद्धतीस नकार दिल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आणि ही निवडणूक थेट पुढच्या वर्षी होणार असल्याचे समोर आले आहे.
Check Also
अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’
आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …
RamPrahar – The Panvel Daily Paper