Breaking News

रायगडास परतीच्या पावसाचा तडाखा

अलिबाग ः प्रतिनिधी

मागील कित्येक वर्षांत परतीच्या पावसाने जेवढा धुमाकूळ घातला नव्हता तो यंदाच्या पावसाने घातला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत बरसलेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रायगडात कहर केला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बंगालच्या उप महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व त्याची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. 10 ऑक्टोबरपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने भातशेतीसह इतर पिकांचेही अतोनात नुकसान केले. शिवाय जनजीवनही विस्कळीत करून टाकले. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीपासून रायगडात पावसाचा जोर वाढला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत बरसलेल्या पावसाने रात्रभर धिंगाणा घातला. त्यामुळे रात्र भीतीच्या सावटाखाली सरली. पहाटे पावसाचा जोर काहीसा ओसरला. गुरुवारी पुन्हा दुपारनंतर अलिबागसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार पुनरागमन केले. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 17 ऑक्टोबरपर्यंत विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छामारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर राहावे. सुखे अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेशी औषधे, पिण्यासाठी पाणी व्यवस्था करण्यात यावी. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी 02141 222118/8275152363 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply